144th Prakat Din 2022

26th February 2022
Gajanan Maharaj UK Parivar Trust (GMUKPT) celebrated Shri Gajanan Maharaj 144th Prakat Din on Saturday 26th Feb 2022.

Bhakt gan gathered in huge numbers from all over UK to pay their respect toward Maharaj. Young families along with their children also attend the function.

The venue in Ilford east London has been converted into Shir Gajanan Maharaj Temple in Shegaon, chants of “Jai Gajanan” , “Gan Gan Ganat Botey” were echoing loudly in a hall.

Maharaj Rajat Mukhavataa & Paduka pujan – abhishek was performed in traditional vedic paramparaa. Upasanaa Bhajan, Samuhik Parayan, Aarti singing was concluded with a prayer-
“|अनंत कोटी ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सत्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय|"

Bhakata gan enjoyed mahaprasad and the sohala was concluded with the Palakhi sohala. YOung and old joined in with playing Lezim and dancing in devotion.

GMUKPT, celebrated the day with combination of East & West... traditional cakae cutting was included.

Gajanan Maharaj UK Parivar Trust is already performing regular Gajanan Mauli seva in Sai Temple in Eastham, London and progressing well to acquire premises for own mandir.

With ashirwad from Gajanan Maharaj the Trust is progressing to collect funds / donations. All sevekaris are doing excellent service.
२६ फेब्रुवारी २०२२! जय गजानन!
श्री गजानन महाराजांचे भक्त आज फक्त भारता पुरते मर्यादित न राहता जगभरात पोहोचले आहेत. आणि जिथे असतील तिथे एकत्र येऊन महाराजांचे सर्व उत्सव साजरे करतात. आज आम्हाला अश्याच एका परिवारासोबत म्हणजेच UK परिवारासोबत महाराजांचा प्रगट उत्सव साजरा करायची संधी मिळाली.

शिस्त! हि महाराजांची पहिली शिकवण!

बरोबर सकाळी ९.३० ला सगळे सेवेकरी ठरलेल्या ठिकाणी एकत्र आले! एखादा उत्सव , तेही परदेशात करायचा म्हणजे खूप पूर्व तयारी लागते. घरून आणायचे सामान, पूजेची तयारी, प्रसादाची सोय, लहान मुलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्था आणि त्यात भरीत भर म्हणजे सगळीकडून Covid ची भीती आणि नियम! इतक्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सगळे सेवेकरी आपापल्या घरून ठरलेल्या सर्व वस्तू घेऊन वेळेवर हॉल वर पोहोचले. सर्वांच्या गाड्या अगदी तुडुंब भरल्या होत्या. एक एक करून सगळं सामान हॉल च्या आत न्यायचं ठरलं. सर्व प्रथम महाराजांच्या पादुका, मूर्ती आणि मुखवटा आत न्यायचं ठरलं. त्याच्या औक्षणाची देखील तयारी होती. छान सुबक तबकात निरंजन लावली, ५ सुवासिनींनी महाराजांना ओवाळलं आणि

"|अनंत कोटी ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सत्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय|"

अश्या मोठ्या जयघोषात उत्सवाला सुरुवात झाली!

झालं!! त्या नंतर जे पायाला भिंगरी लागल्या सारखे सर्व सेवेकरी कामाला लागले ते बहुतेक एक्दम संध्याकाळीच बसले! कोणी पूजेचे सर्व सामान काढायला घेतले तर कोणी पालखी सजवायला सुरुवात केली. कोणी स्वयंपाक घरात चहा चा ताबा घेतला तर कोणी आणलेला सर्व प्रसाद आणि जेवणाचे डबे नीट लावले. तेवढ्यात गुरुजी पण आले त्यांनी पूजेची तयारी सुरु केली. पटपट टेबल खुर्च्या लावल्या गेल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे इतके शे -दीडशे लोक अपेक्षित होते तरी सर्व महाप्रसाद सेवेकऱ्यांनी घरून करून आणला होता. किती तरी दिवस आधी पासून ह्याची तयारी सुरु होती. मोठमोठाले डबे स्वयंपाकघरात ठेवले गेले. हळू हळू लोक येत होते आणि मूळ कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सर्वप्रथम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक, सत्यनारायणाची पूजा झाली. एका नवविवाहित दाम्पत्याच्या हातून ही पूजा करण्यात आली. त्या नंतर महाराजांच्या मुखवट्याला अभिषेक, त्याची पूजा झाली. एका मोठ्या मंचावर मोठ्या टेबल वर महाराजांचा फोटो , त्या समोर विठ्ठल रुक्माई ची लोभस मूर्ती, एका बाजूला स्वामी समर्थ आणि दुसऱ्या बाजूला साई बाबा अश्या सर्व फोटोंची सुरेख रचना मंडळी गेली! महाराजांचा रजत मुखवटा म्हणजे अगदी शेगाव ची आठवण करून देणारा होता. अभिषेक झाल्यावर त्याला सुरेख शृंगार केला गेला आणि अगदी समोर एका आसनावर तो ठेवला. त्याच्या सजावटी साठी अगदी शेगाव ला समाधी स्थानावर असतात तश्या ताज्या फुलांच्या माळा आणल्या होत्या. आदल्या दिवशी ही सगळी तयारी करून ठेवायची, त्यामुळे एक एक फुलाची माळ एका पातळ ओल्या कापडा मध्ये अगदी जपून आणली होती. एक एक करून सेवेकर्यांनी मुखवट्याचा साज सुरु केला. बघता बघता त्याला अगदी शेगाव च स्वरूप आलं आणि ते बघून सर्वांचे डोळे पाणावले!

पूजा , सजावट सगळं झालं आणि नामजपाला सुरुवात झाली.

विठू माउली, स्वामी, साईनाथ महाराज, गजानन महाराज अश्या सर्व संतांचा जप सर्व सेवेकर्यांनी अगदी उत्साहात केला. त्या नंतर महाराजांचे आवाहन ,अष्टक, बावन्नानी असे सर्व श्लोक म्हणून झाले. तो पर्यंत इकडे महाप्रसादाची पूर्ण तयारी झाली होती.

एक देवांचा आणि एक संतांचा असे दोन सुरेख नेवेद्य वाढल्या गेलेत. त्यात देखील कुठेही कमी नाही. पिठलं , भाकरी, ठेचा, मका , कांदा, हिरवी मिरची, पोळी, श्रीखंड, मटकी उसळ, पनीर ची भाजी, भजे, पापड असा साग्रसंगीत नेवेद्य! सत्यनारायणाचा प्रसाद वाटायला लहान लहान वाट्यांमध्ये तीर्थ आणि प्रसाद भरला गेला. महाराजांची दुसरी शिकवण म्हणजे ,' सर्वाना एकसारखा मान!' त्यामुळे प्रत्येक भक्तांनी आणलेला पदार्थ महाराजांसमोर ठेवला गेला. प्रत्येकानी आपल्या माउली साठी प्रेमाने काही ना काही आणले होते , ते सर्व महाराजांसमोर ठेवलं गेलं आणि ते सगळं पचवायला म्हणून छान लहानश्या वाटीत ,'तांबूल'!


आरती ला सुरुवात झाली, एक एक करून सर्व भक्तांनी आरती ओवाळली, फेसबुक live च्या माध्यमातून अनेक भक्तगणांपर्यंत आरती पोहोचली. एव्हाना हॉल मध्ये १०० हुन अधिक भक्तगण होते.

लहान मुलांना महाराज अधिक जवळचे वाटावे म्हणून त्यांचा प्रगट दिन म्हणजेच 'वाढदिवस' cake कापून देखील साजरा केला गेला!! जुनी आणि नवी संस्कृती इथे एक झाली. नवीन पिढीने ,'Happy birthday dear Maharaj !' असं गाणं म्हणून celebrate केलं!

महाराजांची तिसरी आणि सर्वात महत्वाची शिकवण म्हणजे,'अन्नम ब्रम्हेती|' , त्याचा अगदी पूर्ण विचार सेवेकऱ्यांनी केला होता आणि अगदी शिस्तीत महाप्रसादाचे वाटप सुरु झाले. त्याचा पूर्ण ताबा आमच्या तरुण आणि लहान सेवेकऱ्यांनी घेतला होता. ८-१५ वयोगटातल्या आमच्या छोट्या माउलींनी सर्वांना प्रसाद वाटला आणि छान सर्वांचे जेवण आटोपले.

जेवणानंतर पालखी ची तयारी सुरु झाली! इथे परदेशात पालखी होणार हे बघायला अनेक लोक उत्सुक होते. एक एक भाग तिथे जोडून सेवेकरांनी सुरेख पालखी तयार केली होती. त्याला फुलांच्या माळांनी आणि रेशमी वस्त्रांनी सजवलं गेलं. महाराजांचा मुखवटा त्यात ठेऊन त्याला ताज्या फुलांची आरास झाली आणि महाराजांची पालखी निघाली. अगदी भारतात होते तशी पालखी आणि त्याच्या स्वागताला आमच्या सर्व सख्यानी हातात लेझीम आणि झांजा घेऊन पालखी समोर छान पाऊल भजन सुरु केले.

'जय गजानन श्री गजानन' असा अखंड जयघोष सुरु होता, त्या पालखी सोबत चालताना प्रत्येकाच्या अंगावर शहारा आला. एक क्षण आपण शेगावच्याच आवारात कुठे तरी पोहोचलो आहोत असं आवर्जून जाणवत होतं. पोथीत म्हंटलं आहे ना ,"न्यूनता ती नाही पडली कशाची" , अगदी कशा कशाची कमी सेवेकऱ्यांनी किंवा महाराजांनी पडू दिली नाही.
पालखी झाल्यावर सर्व भक्तांनी डोळेभरून पालखी, मुखवटा सर्वांचं दर्शन घेतलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

इथून पुढे आवरासावर! सकाळपासून सगळी तयारी करताना मनात खूप उत्साह असतो पण जसजसा कार्यक्रम संपतो तसं मनावर एक विचित्र दडपण येतं. अनेक दिवस ज्या उत्सवाची तयारी करत होतो तो उत्सव पूर्ण झाल्यावर सगळी आवरासावर करणं फार अवघड वाटतं. घरून गणपती निघताना कशी मनात घालमेल असते तसंच काही तरी सेवेकर्याचं झालं होतं . दिवसभर कामात असलेले सेवेकरी , बाहेरून आलेले लोक गेल्यावर एक एक करून महाराजांचं दर्शन घेतात आणि 'चुकलं माकल माफ करा आणि पोटात घाला ' असं मनातच महाराजांना म्हणतात. आणलेला सगळं सामान एक एक करून परत गाडीत टाकल्या गेलं आणि शेवटी मुखवटा आणि मूर्ती उचलायची म्हणून सगळे थांबले होते. आपण आपल्या आई बाबांसोबत काढतो तसा एक फोटो महाराजांसोबत काढू म्हणून सगळे सेवेकरी मंचावर बसले आणि फोटो झाल्यावर परत एकदा मोठ्याने महाराजांचा नाम गजर झाला. बस! त्याने दिवसभराचा शीण नाहीसा झाला.
दिवसभर सगळीकडे महाराजांचं अस्तित्व जाणवत होतं. त्याला कारण म्हणजे निरपेक्ष मनाने केलेली महारांची सेवा. निरंतर अशीच सेवा घडू द्या एवढीच त्यांना हाथ जोडून प्रार्थना!
जय गजानन!