Gajanan Maharaj Pragat Din 2025

 
 
 

Gajanan Maharaj Prakat Din 2025

Venue - Garth Hill College, Bull Lane, Bracknell, RG42 2AD

गेल्या 23 तारखेला GMUKPT (गजानन महाराज UK परिवार ट्रस्ट) ने गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रम खूप खूप छान झाला. व्यासपीठ फुलांनी सुशोभित केले होते. त्यावर गजानन महाराजांची मूर्ती आणि मुखवटा झळाळत होता. त्याभोवती केलेली फुलांची आरास, सुगंधी हार, शंकराची पिंड, एकीकडे विठ्ठल रखुमाई यांची सावळी मूर्ती. सगळेच अगदी प्रसन्न वातावरण! सकाळी नामजप, नंतर अभिषेक, मग आरती. आणि दर्शनासाठी रांगेत उभे असताना अगदी शेगाव सारखी सुंदर शांतता.. कारण कार्यकर्ते हे मूकपणे, हातात board घेऊन शांतता राखण्याची विनंती करीत होते. आणि लोक ते आनंदाने पाळत ही होते. दर्शन झाल्यावर एकीकडे साखळी पारायणाची व्यवस्था केली होती. इच्छुकांनी तेथे गजानन महाराजांच्या सुबक, मोठ्या तसबिरीसमोर, उदबत्त्यांच्या, धुपाच्या मंद सुवासात 'गजानन विजय' पोथीतला कार्यकर्त्याने सांगितलेला अध्याय वाचायचा. मला 13 वा अध्याय आला, ते वाचताना अजूनच आनंद झाला कारण त्या अध्यायात शेगावचे मंदिर उभारताना भक्त मंडळींनी कस-कसे प्रयत्न केले, लोकांनी त्याला हातभार लावला याचे वर्णन आहे. आणि इथे आम्हीही सगळेच जण UK ला गजानन महाराजांचे मंदिर व्हावे हा संकल्प मनात धरून या कार्यक्रमाला जमले होतो. त्या नंतर भोजन प्रसाद! तो तर इतका चविष्ट की भक्त निवासाच्या भोजन कक्षातल्या प्रसादाची आठवण व्हावी. त्या नंतर सुयोग शेंबेकर आणि विराज भोसले यांनी शिवाजी महाराजांविषयी सादर केलेला, presentation आणि मुलाखतीच्या स्वरूपातला एक सुंदर कार्यक्रम.. आणि त्यानंतर गजानन महाराजांची वाजत-गाजत पालखी आणि मिरवणूक निघाली. लहान मुलांनी खूप सुंदर लेझीम सादर केले. आणि या सुन्दर सोहळ्याची सांगता झाली ती गर्जना UK च्या अप्रतिम ढोल, ताशा पथकाने. अतिशय सुंदर आणि मुख्य म्हणजे शिस्तबद्ध असे कार्यक्रमाचे नियोजन होते. दिवसभरात 550+ लोक येऊनही कुठे ही यत्किंचित ही गडबड, गोंधळ नव्हता. माझ्याप्रमाणे अनेकांना आपण UK त नसून शेगावला असल्याचाच भास झाला असेल याची मला खात्री आहे. GMUKPT ला या सोहळ्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि कौतुक, तुम्हा सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला ही हे सगळे UK त अनुभवता आले. लवकरच गजानन महाराज UK मध्येही मंदिरात स्थानापन्न होवोत ही श्रीचरणी प्रार्थना! जय गजानन!
विपुला नायगांवकर–कुळकर्णी